'वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'चे महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन
गोरगरीब रुग्णांना प्राथमिक उपचार मोफत मिळावेत यासाठी दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार ठाण्यात देखील वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सोमवारी 1 फेब्रुवारी 2021 रोजी घोडबंदर रोडवरील आझादनगर व मानपाडा येथील आपला दवाखाना'चे उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.
ठाण्यातील गोरगरीब नागरिकांना तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी अशा प्रकारचे दवाखाने सुरू करावेत अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनाही ही संकल्पना आवडली व त्यांनी प्रलंबित असलेला हा विषय तातडीने मार्गी लावण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले. त्यानुसार ठाणे महानगरपालिका आणि वनरुपी क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरात एकूण 14 ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्यांचा गोरगरीब रुग्णांना फायदा होत असून दिवसाला 100 हून अधिक रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असून रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधेही मोफत दिली जात आहेत.
आझादनगर नगर येथील रायगड चाळ, मानपाडा मधील सर्वोदय शाळेच्या बाजूला या वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. गोरगरीब रुग्णांना महागड्या रुग्णालयात उपचारासाठी जाणे परवडत नाही. तसेच ठाणे, मुंबई या ठिकाणी उपचारासाठी येण्याकरिता वेळ व पैसा देखील खर्च होतो, आजारी असलेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार तातडीने उपचार मिळावे यासाठी मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक उपचारांव्यतिरिक्त जर काही तपासण्यांची आवश्यकताअसेल तर अशा रुग्णांना पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन देखील या आपला दवाखानामधील डॉक्टर्स करत आहे. ठाण्यातील लोकमान्यनगर, सावरकरनगर, रामनगर, कळवा, दिवा आदी विविध ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावल्याबद्दल महापौरांनी त्यांचेही आभार व्यक्त केले.
No comments