कोविड काळात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेले ठाणे जिल्हा परिषदेचे अरुण शिरोसे यांच्या कुटुंबियांना ५० लाखांच्या विम्याचे वितरण
कोविड काळात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेले ठाणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे शिपाई अरुण कृष्णा शिरोसे यांच्या वारसांना राज्य शासनाने ५० लाखांचा विमा कवच निधी मंजुर केला होता. आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांच्या हस्ते कोविड योध्दा शिरोसे यांच्या पत्नी व मुलाकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन ) अजिंक्य पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.
कोरोना काळात कर्तव्य बजावताना कोरोना विषाणू संसर्गामुळे ३० सप्टेंबरपर्यंत मृत्यू झालेल्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा विमा कवच रक्कम देण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निर्देशाने शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला होता. त्याप्रमाणे ठाणे जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन विभाग ) अजिंक्य पवार यांनी शिरोसे यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करून विहित मुदतीत शासनाकडे प्रस्ताव सादर केला. शिरोसे हे १९८७ साली जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाले. तब्बल ३२ वर्ष त्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागात शिपाई पदावर सेवा बजावली. मुख्यतः त्यांनी ग्रामीण विकास यंत्रणा, आणि सामान्य प्रशासन विभागात काम केले. शिरोसे यांच्या पश्चात पत्नी अश्विनी, मुलगी उत्तरा व मुलगा जयेश असा परिवार आहे.
No comments