Header Ads

 • ताजा खबरें

  उल्हासनगर येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनामुळे मेंदूचा झटका...बोलण्याची क्षमताही गमावली होती

   


  अंबरनाथ(बदलापूर विकास मीडिया):-

  कोविड-१९ हा फुफ्फुसाशी संबंधित असणारा आजार आता मेंदूवरही आघात करू लागला आहे. एका ४८ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीला या आजारासह मेंदूचा झटका( ब्रेन स्ट्रोक) आल्याचे समोर आले आहे. या स्ट्रोकमुळे रूग्णाच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याने त्यांना बोलता येत नव्हतं. अशा स्थितीत मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड रूग्णालयात या रूग्णावर स्पीच थेरपीद्वारे उपचार करण्यात आले आहे. या उपचारामुळे हा रूग्ण कोरोनातून बरा होऊन आता सर्वसामान्य आयुष्य जगू लागला आहे.
                 तिरूपती स्वामी (४८) असे रूग्णाचे नाव असून ते उल्हासनगरमधील रहिवासी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये ते कार्यरत असून त्यांना गायनाची आवड आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना ताप, खोकला आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. शारीरिक अशक्तपणा सुद्धा जाणवत होता. प्रकृती अधिकच बिघडू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केलं. याठिकाणी ८ ऑगस्ट रोजी कोविड-१९ चाचणी अहवालात ते पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. विशेष म्हणजे, रूग्णालयात आणले तेव्हा रूग्णाला बोलताही येत नव्हतं. एमआयआय चाचणीत मेंदूच्या डाव्या अर्ध्या भागात ब्रेन स्ट्रोक असल्याचं निदान आलं. अशावेळी रूग्णावर स्पीच थेरपीद्वारे उपचार करण्यात आले आहे. 

  याबाबत बोलताना मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयातील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखीजा म्हणाले की, ‘‘या रूग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्यातच मेंदूचा झटका आल्याने त्यांना बोलता येत नव्हतं. संवाद साधतानाही अडचणी जाणवत होत्या. वैद्यकीय भाषेत याला अप्सिया असं म्हणतात. अशा परिस्थितीत रूग्णांवर मेलोडिक इनटोनेशन थेरपी (एमआयटी) द्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला. ही थेरपी शब्द व अर्थपूर्ण भाषा सुधारण्यास करण्यात मदत करते.’’ ‘‘जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) नं कोविड-१९ व्हायरस ही जागतिक समस्या असल्याचे जाहिर केलं होतं. या घोषणेला आता सहा महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. या कोरोना विषाणूंबाबत लोकांमध्येही जागरूकता वाढू लागली आहे. फुफ्फुसांपुरताच मर्यादित असणारा हा आजार असणारा आता मेंदूवरही परिणाम करत असल्याचं दिसून येत आहे. मेंदूचा स्ट्रोक ही अतिशय गंभीर समस्या आहे. यावर वेळीच निदान व उपचार होणं गरजेचं आहे. उपचारास विलंब झाल्यास याचा परिणाम अवयवांवर आणि भाषेवर होऊ शकतो,’’ असेही डॉ. मखीजा म्हणाले. 
              वोक्हार्ट रूग्णालयातील स्पीच थेरपिस्ट नूतन कोरगावकर म्हणाले की, ‘‘स्ट्रोकचा झटका आल्याने रूग्णाच्या बोलणाऱ्या क्षमतेवर परिणाम झाला होता. अशा स्थिती आम्ही त्यांच्यावर स्पीच थेरपीद्वारे उपचार केले. संगीत आणि गाण्याबद्दलच्या त्याच्या प्रेमामुळे कदाचित त्यांची संवाद साधण्याची क्षमतेत सुधारणा झाली. आता ते सर्वसामान्यांप्रमाणे बोलू लागले आहेत.’’
               रूग्ण स्वामी म्हणाले, “स्ट्रोकचा तीव्र झटका आल्याने मी बोलू शकत नव्हतो. त्यामुळे कुटुंबात चिंतेचे वातावरण होते. या कठिण काळात मार्गदर्शन करणार्‍या डॉक्टरांच्या टीमचे आम्ही आभारी आहोत. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मी पुन्हा बोलू शकतोय.’’'

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad