Header Ads

 • ताजा खबरें

  सत्तेची ‘खाज’ शमत नाही हे दुर्दैव.... मधुकर मुळूक

   


  प्रहार/मधुकर मुळूक (संपादक -पत्रकार दैनिक वृत्तानंद, ठाणे)

  (बदलापूर विकास मीडिया):-

      दारात उष्टे खाण्यासाठी येणार्‍या कुत्र्याला चारवेळा लाठीचा ‘प्रसाद’ द्यावा, तरीही तो सुधारण्याऐवजी पुन्हा पुन्हा घराच्या उंबर्‍यात डोकावतो.  काही ‘उष्टे तुकडे’ पडलेत का ते पाहतो. याला म्हणतात, ‘जित्याची खोड, मेल्याशिवाय जात नाही’!
  वाचक सुज्ञ आहेत. तुम्हाला कळलेच असेल की, महाराष्ट्राचे सरकार लवकरात लवकर पडावे. आम्ही सत्तेवर यावे, असे कुणाला वाटते? अर्थातच भारतीय जनता पार्टी! उद्धव ठाकरे सरकारवर पहिल्यांदा कंगना राणावत बरसली.  ‘पाकव्याप्त काश्मीर’ (पीओके)ची उपमा देऊन मुंबईकरांच्या जखमेवर तिने मीठ चोळलं.
  एवढ्यावर हा ‘तमाशा’ थांबला नाही. कंगना राणावतला सन्मानाने राजभवनावर बोलावून तिची आस्थेवाईकपणे चौकशी करणार्‍या राज्यपाल भगत सिंग कोश्यारींनीही मुंबईच्या भावनांवर मीठच चोळले.आता तर कहरच झाला. राज्यपालांनी धर्मनिरपेक्षतेची शपथ घेऊन ते संविधानात्मक पद स्वीकारलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘ते’ ‘हिंदुत्व’ शिकवू लागलेत.

      तुम्ही गंगा पुजनासाठी अयोध्येला गेला होता. विठ्ठल - रखुमाईची पुजा करण्यासाठी पंढरपुरला गेला होता. तुम्ही हिंदुत्व सोडून धर्मनिरपेक्षवादी कधीपासून झालात? हा प्रश्न एक राज्यपाल जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारतो. तेव्हा समजावं भाजपाची सत्तेची खाज काही शमत नाही. पहाटे पहाटे राष्ट्रपती राजवट उठवून, शपथविधी उरकणार्‍या राज्यपालांना व देशाच्या जबाबदार मंत्र्यांना धडा शिकवूनही भाजपाच्या कार्यपद्धतीत बदल होत नसेल तर ही ‘सत्तेची हाव’ कोणत्या स्तराला पोहोचलीय? मंदीरे उघडण्याऐवजी देवा डोळे उघड रे बाबा!

      गुळाला मुंगळा चिकटावा व मुंगळा काढताना त्याचे दोन्ही पाय तुटावे तरीही त्याचे दोन हात व तोंड त्या गुळाच्या ढेपेतच रमावेत अशी अवस्था भाजपाची झालीय. राज्यपाल जेव्हा भाजपा नेत्याची भूमिका वठवतो तेव्हा राज्य चौकटीत चाललंय, असं  वाटत नाही. राज्यपालाने नियमबाह्य काय होतंय तेवढं पाहून संविधानाच्या रक्षणार्थ राज्यकर्त्यांना ‘समज’ द्यावी. इथे मात्र 170 आमदारांचा पाठींबा घेऊन संविधानाची शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना शहाणपणाचे धडे देत, 105 आमदारांचा चमू घेऊन उंबर्‍यात जीभा चाटत बसलेल्या भाजपाची जास्त करमणूक करण्यात राज्यपाल गुंतलेत. याला ‘सत्तेची खाज’ नाही तर काय म्हणणार?
  मुख्यमंत्री हे राज्य चालविण्यासाठी सक्षम असताना ‘राज्यपालांचे क्लास’ त्यांना नको असताना का दिले जातात? कोश्यारी वयाने मोठे आहेत म्हणून एका संजीवनी बुटीसाठी ते काय अख्खा द्रोणागिरी उचलणार आहेत काय?

      कायद्याच्या चौकटीत काय आहे तेवढेच करावे. भारतीय जनता पक्षाची सत्ता यावी, पुन्हा देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री व्हावेत, असा विचार राजभवन करत असेल तर तो पक्षपात आहे.
  खरं तर काँग्रेस-शिवसेनेला या भाजपाने कधीच ‘गुंडाळलं’ असतं. एक पहिलवान ‘खमक्या’ निघाला. काळ्या दगडावर पांढरी रेष ओढून सह्याद्रीकडे नजर लावून बसलाय. हिमालयाला प्रसंगी ‘आव्हान’ देतोय. त्यांचं नांव ‘शरदराव गोविंदराव पवार’! पवार आहेत तोवर महाराष्ट्र मिळणार नाही हे मोदींना कळलंय. मग नागपूरचा हा बामण अधूनमधून का लाथा झाडत असतो?

      कर्नाटकात काँग्रेस विकली गेली म्हणून येडियुरप्पाची सत्ता पुन्हा आली. मध्यप्रदेशात काँग्रेसचा लिलाव झाला म्हणून शिवराजसिंग चौहानची सत्ता आली. राजस्थानात काँग्रेस सांभाळणारा गेहलोत सारखा नेता जागा होता म्हणून राजस्थान वाचले. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेनेचा एकच लाठीधारी आहे. शरदरराव पवार. मोदी-शहा सर्वात प्रथम पवारांकडे पाहतात. त्यांची लाठी कुणावर पडू शकते याचा अंदाज घेतात. मगच चुळबुळ करतात. एक वर्ष फडणविस वांझोटी मेहनत करताहेत. सत्ता मिळावी म्हणून ललिता पवारला दिपिका पदूकोण समजून रोज गुलाबपुष्प पाठवितात. सत्ता अशी मिळणार आहे का? बुद्धीबळाच्या सारीपाटावर ज्यांनी 54 वर्षे निर्विवाद वर्चस्व गाजवलं त्या पवारांना अजून बरेचसे ‘हिशोब’ चुकते करायचे आहेत. 17 ऑक्टो. रोजी खडसे राष्ट्रवादीत येवून गेलेल्या पाखरांना ‘परत फिरा रे’  अशी साद घालणारच आहेच. मग भाजपाचा चेहरा कसा दिसेल? 105 - 86 = 19 भाजपावाले उरतील.

      सत्ता ही सीतेला भुरळ घालणारी हरिण आहे. हरिणीच्या कातड्याची चोळी घालण्याच्या नादात स्वतःचं अपहरण होतं हे ‘रामायण’ महाकाव्यातून शिकलं पाहिजे. त्यामुळे सत्तेचा एवढा मोह बरा नाही. वाकड्या तोंडाचा गांधी आण्णा हजारे गप्प का आहे? भाजपाला ‘क्लीन चिट’देणार्‍या या ‘ढोंगी  महात्म्या’ने फडणविसांना चार कानमंत्र द्यावेत. बाबा गप्प बस्स! समोर पवार आहेत. मी संपलो तिथे तुझी काय बिशाद? असं अण्णांनी बोललं पाहिजे.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad